.. प्रवास …
सुरुवात का, शेवट कुठे,
अस्तित्वाच्या प्रश्नांचा.. थांग काही लागत नाही...
प्रवास शेवटच्या वळणावर पण,
हव्या नको उत्तरांची.. रांग काही लागत नाही...
दुःखाचा जागर,
सुखाच्या वळणावर खुंटतो का?
जन्माचा प्रश्न,
मरणानंतर तरी सुटतो का?
मुळात माणूस थांबला तरी,
प्रवास त्याचा थांबतो का?
एक अनेक हजार प्रश्नांची, भूक काही भागत नाही...
हव्या नको उत्तरांची.. रांग काही लागत नाही...
का अडकायचं..
नात्यांमध्ये.. साच्यांमध्ये...
नोकरी-धंदा, पैसा-अडका,
धर्म-जातीच्या.. जाचांमध्ये...
असं करा, तसं वागू नका,
मुक्त श्वासांची फट शोधा, नियमावलीच्या खाचांमध्ये...
जन्म माणसाचा मिळतो पण, माणूस म्हणून वागत नाही..
हव्या नको उत्तरांची.. रांग काही लागत नाही...
कोणास ठाऊक, उत्तरे,
शोधायचीच नसतील, कदाचित..
प्रवासाचेच प्रवासी,
होऊन राहायचे असेल, कदाचित..
भोगी होऊ, साधू बनू,
रस्त्यासोबत फक्त वळायचे असेल, कदाचित..
एकटेपणाची, एकत्रपणाची,
आयुष्याची वीण,
अनुभवायची असेल, कदाचित.
- अनेकीनेक